Sunday, July 13, 2008

यूपी-बिहारवाल्यांना रेशनकार्ड देताना सावध राहा - राज ठाकरेंबई, ता. ११ - यूपी-बिहारमधून बेकायदा येणाऱ्या लोंढ्यांच्या तावडीत मुंबईसह अवघा महाराष्ट्र सापडलेला आहे. हे संकट रोखण्यासाठी सर्व सरकारी मराठी अधिकाऱ्यांनी कोणालाही रेशनकार्ड, डोमिसाईल सर्टिफिकेट, परवाने देताना, तसेच परप्रांतीयाचे नाव मतदार यादीत समाविष्ट करताना सावध राहावे. प्रत्येक कायदे, नियम व अटी यांचा गांभीर्याने विचार करा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबईसह जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी राज ठाकरे यांनी सुमारे पाऊण तास पदाधिकाऱ्यांना रोखठोक शब्दांत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की माझे कार्यकर्ते माझ्या स्वाक्षरीचे चार पानी पत्र सर्व सरकारी मराठी अधिकाऱ्यांना देणार आहेत. या पत्रानुसार संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्यासाठी आपण एका महिन्याची मुदत देत आहोत. पण त्यानंतरही परिस्थिती सुधारली नाही आणि लोंढे रोखले नाहीत, तर मनसे आपल्या स्टाईलने आंदोलन करील, असा इशारा ठाकरे यांनी दिला. मुंबईत येणाऱ्या लोंढ्यामध्ये बरीचशी मंडळी ही उत्तर प्रदेश व बिहारमधून येतात, त्यांना काही महिन्यांतच रेशनकार्ड मिळते. टॅक्‍सीचे परवाने मिळतात; त्यामुळे बेकायदा बकाल झोपड्या उभ्या राहतात. त्यांच्यामागून त्यांचे नेते येतात आणि महाराष्ट्रावर राज्य करण्याचे स्वप्न पाहतात. इथली मराठी संस्कृती धाब्यावर बसवितात, असेही राज यांनी नमूद केले. या सर्व पार्श्‍वभूमीवर सर्व सरकारी मराठी अधिकाऱ्यांनी सावध राहा; अन्यथा एक दिवस साऱ्या नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदा यूपी-बिहारवाल्यांच्या हातात जातील, असा धोक्‍याचा इशारा त्यांनी दिला. ते पुढे म्हणाले, की सध्या काही अधिकारी साध्या चिरीमिरीसाठी वा अन्य काही कारणांसाठी जे करतात, तेच तुम्हाला तुमच्या भय्या राज्यकर्त्यांच्या मिजासखोर गुंडशाही हुकुमावरून करावे लागेल. तेव्हा तुम्हाला पश्‍चात्ताप होईल; पण तोवर वेळ निघून गेलेली असेल. या बैठकीत मनसेचे सरचिटणीस आमदार बाळा नांदगावकर यांचे भाषण झाले; तर सरचिटणीस शिरीष पारकर यांनी सूत्रसंचालन केले. ----------------------------------------------------- राज ठाकरे यांची हेल्पलाईन आपण केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व सुज्ञ मराठी अधिकाऱ्यांनी तातडीने हालचाल करून महिनाभरात चित्र बदलायचा प्रयत्न करावा, अशी आशा राज ठाकरे यांनी व्यक्त केली. यूपी-बिहारच्या भय्यांच्या बेकायदा कारभाराला पाठीशी घालण्यासाठी आपणावर कुणीही दबाव आणला, तर तातडीने माझ्या ९९८७९९९४४४ व ९९८७९९९५५५ या क्रमांकांवर तसेच reachatrajthackeray@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा. आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. -----------------------------------------------------

No comments: